एका रिक्षाचालकाच्या घरात घुसून चोरट्यांनी २५ लाखाची रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. बुधवारी दुपारी जेव्हा हा रिक्षाचालक आपल्या पत्नीसोबत लसीकरणासाठी गेला असताना चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारल्याचं पोलिसांकडून कळत आहे.

उत्तर दिल्लीच्या शिव विहार भागात ही घटना घडली आहे. रिक्षाचालक अरविंद कुमार पतवा यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली. त्यांनी लसीकऱणासाठी बुधवारची वेळ निश्चित केली होती. आपली पत्नी आणि ३ मुलांसोबत ते सकाळी १० च्या आसपास लसीकरणासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या मुलांना उस्मानपूर इथल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी सोडलं आणि त्यांच्या पत्नीसोबत अरविंद लसीकरणासाठी लक्ष्मीनगर भागात केले. जेव्हा ते घरी परतले त्यावेळी त्यांनी पाहिलं की मुख्य दरवाजा उघडा आहे. घरात गेल्यानंतर त्यांना कपाटही अस्ताव्यस्त असल्याचं आढळून आलं.

अरविंद यांनी सांगितलं, “चोरांनी घरातले सर्व दागिने पळवून नेले आणि रोकडही नेली. फक्त काही खोटे दागिने त्यांनी मागे सोडले. घरातले लाईट आणि फॅन सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. माझ्या बहिणीचेही काही दागिने या कपाटात होते. चोरांनी सगळ्या मौल्यवान वस्तू घरातून चोरल्या आहेत. आमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा आम्ही घरी नव्हतो तेव्हा त्यांनी एका माणसाला आमच्या घराबाहेर बसून फोनवर बोलताना पाहिलं. आम्हाला शंका आहे की हा माणूस बाहेर बसून आतल्या व्यक्तीला बाहेरच्या परिस्थितीबद्दल माहिती देत असणार.”

या प्रकऱणी करावल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच याबद्दल पुढची चौकशी सुरु आहे. अरविंद यांनी सांगितलं की ते रिक्षाचालक आहेत तसंच ते राख्यांचा घरगुती व्यवसायही करतात. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या घरातलं कोणीही बाहेर गेलेलं नव्हतं.