अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज (५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. याद्वारेच निमंत्रित व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांची करोना चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वृत्त आहे. भूमिपूजनाचा विधी पार पाडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराचं डिझाइन कोणी तयार केलं माहिती आहे?

भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते अयोध्येत येणार आहेत. त्यामुळे अशा वेळी सावधानतेचा उपाय म्हणून भूमिपूजन सोहळ्यासाठी सेवा देणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, राम जन्मभूमी मंदिराच्या परिसरातील पुजारी या साऱ्यांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मुख्य पुजारींचे सहकारी पुजारी आचार्य प्रदीप दास हे काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय भूमिपूजन सोहळा प्रस्तावित असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष होते.

दरम्यान, भारतातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिराचं डिझाइन अहमदाबादच्या चंदक्रांत सोमपुरा यांनी तयार केलं आहे. गुजरातचे सोमपुरा कुटुंब हे नागर शैलीतील मंदिरांचे शिल्पकार मानले जातात. हे संपूर्ण कुटुंब नागर शैलीची मंदिरे बनविण्यात पारंगत आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे वडील प्रभाशंकर सोमपुरा यांनी गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराची रचना केली. त्यांनी मथुराच्या मंदिराचीदेखील संरचना केली होती. चंद्रकांत सोमपुरा यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी म्हणजे १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांच्यासह अयोध्येला भेट दिली होती. त्यानंतर गेली ३० वर्षे अयोध्येचं संभाव्य राम मंदिर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. पण अयोध्येमधलं राम मंदिर हे त्यातलं सगळ्यात बहुचर्चित मंदिर असणार आहे.