संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सीमेपलीकडे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयासाठी करता येणार नाही, असाच ठोस संदेश आम्ही बालाकोट हवाई हल्ल्यातून दिला, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.

‘एअर पॉवर इन नो वॉर नो पीस सिनारियो’ या विषयावर चर्चासत्रात त्यांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांनी पुलवामा हल्ल्यात दिलेले प्राणांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, त्यांच्या वीरतेस आमचा सलामच आहे. हवाई, सागरी व इतर मार्गानी हल्ले होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत व हवाई दलाचे प्रमुख आर. के. भदौरिया यावेळी उपस्थित होते. रावत म्हणाले की, बालाकोट हल्ल्यात सीमेपलीकडून भारताविरोधातील छुपे युद्ध खेळले जाते ते खपवून घेतले जाणार नाही, असाच संदेश देण्यात आला होता.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, बालाकोट हवाई  हल्ल्यातून सीमेपलीकडील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय घेता येणार नाही असा संदेश आम्ही दिला आहे. पाकिस्तानसाठी भारताविरोधात दहशतवादाचा वापर हा सोपा पर्याय आहे, पण आम्ही त्यांना बालाकोट हल्ल्यातून धडा शिकवला, सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ हे यापुढे कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थाने ठरणार नाहीत हे आम्ही दाखवून दिले. संयुक्त युद्धतंत्र ही आजची वास्तविकता आहे.

संरक्षण प्रमुखांकडून राजकीय नेतृत्वाचे कौतुक

संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, प्रतिस्पर्धी देशाला धाकात ठेवण्याचे एक युद्धतंत्र असते. त्यामुळे जमीन, सागर व हवाई मार्गाने शत्रूला हल्ला करू देता कामा नये. त्यासाठी प्रत्येक जवान व अधिकारी प्रशिक्षित असले पाहिजेत. राजकीय इच्छाशक्तीही मजबूत हवी. कारगिल, उरी  व पुलवामा  हल्ल्यावेळी आमच्या राजकीय व लष्करी नेतृत्वाने ठोस निर्णय घेतले त्यामुळे  ठोस प्रत्युत्तर देता आले.