करोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. नागरी उड्डाण संचालनालयानं या निर्णयासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. केंद्र सरकारनं देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन अनलॉक ४ मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर संचालनालयानं हे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. भारतात मागील काही दिवसांपासून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण जगात आतापर्यंत भारतातच आढळून आले आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रानं आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून विशेष विमानसेवांना वगळण्यात आलेलं आहे.

आणखी वाचा- दिवाळीपर्यंत करोना नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

नागरी उड्डाण संचालनालयानं आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचं परिपत्रकाद्वारे म्हटलं आहे. याचबरोबर सक्षम प्राधिकरणाद्वारे ठरवण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीला परवानगी दिली जाऊ शकते, असंही म्हटलं आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद आहे.

आणखी वाचा- Coronavirus: भारताच्या नावे नकोसा जागतिक विक्रम, एका दिवसात आढळले ८०,००० बाधित

देशातील स्थिती कशी आहे?

देशात मागील काही आठवड्यांपासून ७० हजार ते ८० हजारांच्या सरासरीनं दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानं हा दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात करोनाची स्थिती आणखी बिकट होत असल्याचेच आकडेवारीतून दिसून आलं आहे.