बांगलादेशमध्ये सध्या सत्तेवर असलेली ‘अवामी लीग’ देशात पुन्हा नवे सरकार स्थापनेसाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश संसदेच्या वादग्रस्त निवडणुकीत या पक्षाने ३०० पैकी तब्बल २३२ जागा जिंकल्या आहेत. ७५ टक्के लोकप्रतिनिधी अवामी लीगचेच असल्याने या पक्षाने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे.
ही निवडणूक पक्षपातीपणे नियमबाह्य पद्धतीने झाल्याने ती पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. निवडणुकीदरम्यान बांगलादेशात मोठा हिंसाचार झाला. मतदानाची टक्केवारीही अत्यंत खालावलेली होती, त्याशिवाय विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या पाश्र्वभूमीवर घेण्यात आलेली ही निवडणूक वादग्रस्त ठरली.
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. अवामी लीगचा सहकारी पक्ष असलेल्या ‘जतिया पक्षा’ला ३३ जागा जिंकता आल्या. मात्र सरकारमध्ये सामील होण्याचा विचार अद्याप त्यांनी केलेला नाही. अवामी लीगनंतर याच पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्याने त्यांना प्रमुख विरोधी पक्ष बनण्याचा पर्यायही त्यांच्यापुढे आहे. सत्ताधारी पक्षाच्या अन्य तीन सहकारी पक्षांनीही १३ जागा जिंकल्या आहेत.
या निवडणुकीत अवामी लीगने नियमबाह्य प्रचार केला असून, मतदारांना भुलवण्यासाठी अनेक योजना राबवल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. निवडणुकीच्या काळात मोठा हिंसाचार होऊन २१ जणांना प्राण गमवावे लागले.

नव्याने निवडणुका घेण्याची अमेरिकेची मागणी
बांगलादेशची सार्वत्रिक निवडणूक लोकशाही मार्गाने लढवली गेली नसल्याची टीका अमेरिकेने केली आहे. या निवडणूका निष्पक्षपातीपणे घेण्यात आल्या नाहीत. जनतेचा विश्वासघात करत अनेक गैरप्रकार निवडणुकीदरम्यान करण्यात आले. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मॅरी हार्फ यांनी केली.