माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामाप्रमाणे सलामीही देण्यात आली. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला अखेरचा सलाम करताना त्यांचे पती स्वराज आणि मुलीचे डोळे पाणावले होते. एवढंच नाही तर स्मशानभूमीत हजर असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलीने, अर्थात बांसुरी स्वराज यांनी यांनी अंत्यविधी पार पाडले.

सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या सगळ्याच दिग्गजांची उपस्थिती होती. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, जे. पी. नड्डा यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती.

मंगळवारी रात्री छातीत दुखू लागल्याने सुषमा स्वराज यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांचे जाणे चटका लावून जाणारे आणि अविश्सनीय आहे असे संघाने म्हटले आहे. तर देशातल्या प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. विरोधी पक्षातले नेते सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जेव्हा पंतप्रधान मोदी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले. केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला याबाबत सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन अभिनंदन केले होते. या दिवसाची आपण वाट पाहिली होती असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते आणि दुर्दैवाने तेच त्यांचे अखेरचे ट्विट ठरले. सुषमा स्वराज यांच्या अकाली एक्झिटमुळे देशभरात हळहळ व्यक्त होते आहे.