आण्विक दायित्व कायदा आणि आण्विक इंधनाच्या वापरावर लक्ष ठेवण्याचा अधिकार, या दोन मुद्दय़ांवरून भारत आणि अमेरिकेदरम्यान गेली सात वर्षे रखडलेला नागरी अणुऊर्जा करार अखेर प्रत्यक्षात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर रविवारी करण्यात आली. अमेरिकी अध्यक्षांच्या अडीच दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवातच अणुकरारातली कोंडी फुटून झाल्याने मुत्सद्दी पातळीवर हे मोठे यश मानले जात आहे.
अणुऊर्जा केंद्रासाठी पुरवल्या जाणाऱ्या आण्विक इंधनाचा वापर व वितरण कशा पद्धतीने होते, यावर अमेरिकेची सतत नजर राहील, अशी अट अमेरिकेने घातली होती. ही अट भारताने नाकारल्याने हा करार रखडला होता. आता अमेरिकेने एक पाऊल मागे घेत आण्विक इंधनाच्या वापरासंबंधात कोणताही हस्तक्षेप न करण्याचे मान्य केल्याने या करारातला पहिला अडसर दूर झाला.
अणुभट्टय़ा उभारताना आणि नंतर त्या कार्यान्वित झाल्यावर जर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी अणुभट्टय़ा उभारणाऱ्या खासगी कंपनीवर टाकणारा ‘आण्विक दायित्व कायदा’ भारताने केला होता. या कायद्याला अनेक अमेरिकन कंपन्यांचा विरोध होता. अणुभट्टय़ा कार्यान्वित झाल्यावर त्या सांभाळणाऱ्यांवरच भरपाईचा बोजा असला पाहिजे, असे या कंपन्यांचे आणि पर्यायाने अमेरिकेचे मत होते. त्यामुळे हा करार तडीस जाण्यातला हा दुसरा मोठा अडसर होता.  
ओबामा आणि मोदी यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर अणुऊर्जा करारातील कोंडी फुटल्याची घोषणा परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी केली. उभय नेत्यांमध्ये संरक्षण सहकार्यावरही विस्तृत चर्चा झाली. उभय देशांतील संरक्षण सहकार्याच्या कराराला आणखी दहा वर्षांची मुदतवाढ दिल्याचे ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. उभय देशांतील संरक्षण सहकार्य नवी उंची गाठणार असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. संरक्षण क्षेत्रात सहविकास आणि सहउत्पादनाचे दोन टप्पेही गाठले जाणार आहेत. याद्वारे अद्ययावत संरक्षण प्रकल्पांची उभारणी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रांचे उत्पादन भारतात होणार असून त्यामुळे देशी उद्योगांनाही पाया विस्तारण्याची संधी लाभेल, असे मोदी म्हणाले.

चाय पे चर्चा..
*हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर फेरफटका मारल्यावर ओबामा आणि मोदी हे चर्चा व चहापानासाठी बसले. मोदींनी ओबामांसाठी चहा ओतला आणि तो कप त्यांच्या हाती दिला.
*संयुक्त पत्रकार परिषदेत या प्रसंगाचा उल्लेख करीत ओबामा म्हणाले की, ‘‘पंतप्रधान मोदी माझे आगतस्वागत केल्याबद्दल आणि आपल्यात ‘चाय पे चर्चा’ घडल्याबद्दल मी आभारी आहे! अशा चर्चा ‘व्हाइट हाऊस’मध्ये अधिक प्रमाणात झाल्या पाहिजेत, पण एकूणच हा दौराही प्रतीकात्मकतेनं भरला असल्याने आपण बराच पल्ला गाठला आहे!’’ २०१४च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ‘चाय पे चर्चा’ मोहीम मोदी यांनी राबवली होती. तिचा उल्लेख ओबामांनी केल्याने खसखस पिकली.

*अणुऊर्जा कराराद्वारे व्यावसायिक सहकार्याकडे आम्ही पाऊल टाकले असून चिकाटीने कार्यरत राहून आम्ही  आण्विक सहकार्यात यशस्वी होऊ.
नरेंद्र मोदी</strong>

*नागरी आण्विक सहकार्य करारातले दोन मोठे अडसर दूर करण्यात आम्हाला यश आले असून या कराराची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– बराक ओबामा