देशातील बेरोजगारीचं एक भीषण वास्तव ओडिशाच्या रस्त्यांवर नुकतंच पहायला मिळालं. नोकरी उपलब्ध नसल्याने रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका व्यक्तीची ही काहाणी आहे. रस्त्यावर झालेल्या एका वादावादीनंतर ही व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. यावेळी अस्खलित इंग्रजीत पोलिसांसमोर त्याने आपली तक्रार मांडली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यास त्याचे शिक्षण ऐकून ते ही अवाक् झाले.

भुवनेश्वर इथली ही घटना असून गिरीजा शंकर मिश्रा (वय ५१) असे या भीक मागणाऱ्या उच्चशिक्षित व्यक्तीचे नाव आहे. रस्त्याच्या कडेला भीक मागत असताना त्याला एका रिक्षाचा जोरदार धक्का बसला. यामुळे जखमी झालेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर त्याने अस्खलित इंग्रजी भाषेत आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे कथन केले आणि रिक्षा चालकाविरोधात तक्रार नोंदवली.

इंग्रजीत बोलणाऱ्या आणि भिकाऱ्याच्या वेशात दिसणाऱ्या या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे शिक्षण बी-टेक झाल्याचे समोर आले. प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये त्यानं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर काही काळ गेस्ट लेक्चरर आणि मिल्टन कंपनीतही त्याने नोकरी केली. मात्र, इथली नोकरी सुटल्यानंतर त्याला लवकर कुठलीही नोकरी मिळू शकली नाही. त्यामुळे त्याने अखेर रस्त्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला. रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध असल्याने आपल्यावर ही वेळ आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.