पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात मॉस्कोमध्ये दहा सप्टेंबरला चर्चा झाली. मात्र त्याआधी पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. चुशूल सब सेक्टरमध्ये वॉर्निंग शॉटस म्हणजे इशारा देण्यासाठी आधी गोळीबार झाला होता. पण त्यानंतर उत्तर किनाऱ्यावर घडलेली गोळीबाराची ही घटना खूप तीव्र आणि मोठी असल्याचे आता समोर आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर्सवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. फिंगर तीन आणि फिंगर चारची रिजलाइन जिथे मिळते, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी १०० ते २०० गोळयांच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

सात सप्टेंबरला चुशूल सब-सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल भारत आणि चीन दोघांनी पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली होती. मुकपरी हाईटस जवळ गोळीबाराची ही घटना घडली होती. ४५ वर्षात पहिल्यांदाच LAC जवळ गोळीबार झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

उत्तर किनाऱ्यावरील गोळीबाराच्या या घटनेबद्दल कुठल्याही बाजूने अद्यापपर्यंत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. चुशूलच्या घटनेनंतर हा गोळीबार झाला होता. दोन्ही बाजूच्या कॉर्प्स कमांडरमध्ये बैठक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवर तणावाची स्थिती कायम आहे.

“पँगाँग टीएसओच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याजवळ सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात बरीच हालचाल सुरु होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

“या भागात एक छोटी घटना घडली, त्याची माहिती द्यावी असे वाटले नाही, त्यामुळे ती रिपोर्ट केली गेली नाही, हीच मुकपरीची घटना होती. ज्यात एक-दोन गोळया झाडल्या. एकदिवसानंतर याबद्दल समजले” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर उत्तर किनाऱ्यावर दोन्ही बाजूंनी १०० ते २०० गोळया झाडल्या असे अधिकाऱ्याने सांगितले. “जिथून चढण सुरु होते, त्या फिंगर तीन आणि फिंगर चारच्या रिंजजवळ ही घटना घडली” अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

२९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. तेव्हापासून, भारतीय सैन्याला तिथून हटवण्यासाठी चीनचे बरेच प्रयत्न सुरु आहे. पण चीनचे सर्व डाव भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. दक्षिण किनाऱ्यावरील उंचावरील भागात मोक्याच्या ठिकाणी भारतीय सैन्य तैनात आहे. त्यामुळे LAC वरील चिनी सैन्य दलाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे.