पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन वाचवा या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार येत्या १४ मे पासून आठ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद राहतील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या राज्यांमधील अंदाजे २० हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील, अशी माहिती पेट्रोलियम वितरक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य सुरेश कुमार यांनी दिली.

केवळ रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल. ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाची माहिती अजूनपर्यंत तेल कंपन्यांना देण्यात आलेली नाही. याबद्दलची चर्चा अजूनही सुरू आहे. आम्ही लवकरच आमच्या संघटनेच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णयाची घोषणा करू, असेही सुरेश कुमार यांनी सांगितले.

आम्ही यापूर्वीही पेट्रोल पंप रविवारी बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यावेळी तेल उत्पादक कंपन्यांच्या आग्रहाखातर आम्ही या निर्णयाचा फेरविचार करत होतो. मात्र, आता रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा आमचा निर्णय पक्का झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मन की बात कार्यक्रमात देशातील इंधनसंपत्ती वाचविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच आम्ही रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत आल्याचे सुरेश कुमार यांनी म्हटले.

या निर्णयामुळे आम्हाला तामिळनाडूत तब्बल १५० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. मात्र, रविवारी पेट्रोलच्या विक्रीत ४० टक्क्यांची घट होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असेही सुरेश कुमार यांनी सांगितले.