पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. हा विजय म्हणजे मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील बंड आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी परदेशातून काळा पैसा आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, असेही त्या म्हणाल्या. कोलकाता येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या नोटाबंदीविरोधातील रॅलीत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रवाना झाल्या आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीचा निकाल हा केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात दिलेला आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. जनतेने मोदी सरकारविरोधात केलेला विद्रोह नाही, तर जनतेने या निर्णयाविरोधात पुकारलेला बंड आहे. भाजपला त्यापासून धडा घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपचे अस्तित्व कुठेही दिसणार नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी काळा पैसा परत आणण्याबाबत आश्वासन दिले होते. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार परदेशात असलेला काळा पैसा परत आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. म्हणून सर्वसामान्य लोकांना त्रास दिला जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या मेहनतीचा पैसा हिसकावून घेतला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, यापूर्वीही मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी उघडपणे विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाविरोधात आघाडी उघडली आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन त्यांनी या निर्णयाविरोधात आघाडी उघडली आहे. दिल्लीत त्यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांना सोबत घेऊन या निर्णयाविरोधात राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात शिवसेनेचे खासदारही सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देऊन मोदी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही केली होती. दरम्यान, नवी दिल्लीत उद्याही या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी नवी दिल्लीला रवाना झाल्या आहेत.