११ लाख लोकांना फटका; पिके उद्ध्वस्त; बांगलादेशातही हाहाकार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे आलेल्या रोणू चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ाला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून नऊ हजा ३६० हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातील तब्बल ११ लाख लोकांना फटका बसला असून शेतीचेही नुकसान झाला असल्याचे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन. चिन्नाराजप्पा यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून आंध्रच्या किनारी भागात पाऊस कोसळत आहे. ३३ मंडलांतील ३० खेडय़ांचे चक्रीवादळ व पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ात शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत ११७ मिमी पाऊस झाला.
चक्रीवादळ व पाऊस यांमुळे दोन जण ठार झाले तर चार जनावरे मृत्युमुखी पडली. विशाखापट्टणम येथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे!
चक्रीवादळाने दिशा बदलून त्याने आता बांगलादेशकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे आंध्रमधील ८०० खेडी व २१ शहरांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

बांगलादेशात १५ बळी
बांगलादेशकडे सरकलेल्या रोणू चक्रीवादळाने आतापर्यंत १५ बळी घेतले असून दक्षिण किनाऱ्यावर हे वादळ कमी उंचीवर आल्याने जोरदारा पाऊस झाला, दरडी कोसळल्या. वादळाच्या तडाख्याने आतापर्यंत १०० जण जखमी झाले आहेत. ताशी ८८ कि.मी वेगाचे हे वादळ शनिवारी दुपारी बांगलादेशात थडकले असून अनेक लोकांनी छावण्यांमध्ये आश्रय घेतला. हजारो लोक जीवाच्या भीतीने पळून गेले. पूर्व व ईशान्य भागाकडे जाताना या वादळाने पहिला तडाखा बरीसाल व चितगाव भागाला दिला आहे. बांगलादेशात अनेक ठिकाणी पाऊस झाला असून जोरदार वाऱ्यांमुळे सकाळपासून भीतीचे वातावरण होते. दक्षिण किनारा भागात वादळाने विध्वंस सुरू केला असून १५ ठार तर १०० जण जखमी झाले आहेत. महामार्गावर झाडे कोसळली आहेत. चितगाव येथील शहा अमानत विमानतळ बंद करण्यात आला आहे. ढाका, खुलना, बारीसाल, चितगाव व सिल्हेट येथे जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. १३ धोकादायक जिल्ह्य़ांतील २१ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.