इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर करताना राजकीय नेत्यांकडून चुका होणे ही सामान्य बाब बनली आहे. परंतु, पश्चिम बंगाल काँग्रेसच्या एका ट्विटमुळे काँग्रेस पक्षावर लाजीरवाणी वेळ आली आहे. शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगाल काँग्रेसने त्यांना अभिवादन करताना त्यांचे एक वादग्रस्त विधान ट्विट केले. दिवंगत राजीव गांधी यांनी १९८४ साली शीख विरोध दंगली दरम्यान हे वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी यावरून मोठा वाद झाला होता. सोशल मीडियावर जेव्हा या ट्विटवरून वाद सुरू झाला तेव्हा काँग्रेसला हे ट्विट डिलिट करावे लागले.
‘जेव्हा एखादे मोठे वृक्ष उन्मळून पडते, तेव्हा धरणीकंप होतो.’ #भारतरत्नराजीवगांधी’ असे ट्विट पश्चिम बंगाल सरकारने केले होते. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या सुरक्षारक्षकांनीच हत्या केली होती त्यावेळी देशात शीख विरोधी दंगल उसळली होती. देशाला शांतता राखण्याचे आवाहन करताना एका भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी खरपूस समाचार घेतला होता. राजीव गांधींच्या वक्तव्यावरून शीख विरोधी दंगल योग्य होती असा संदेश देशात गेल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. राजीव गांधींचे हे विधान त्यावेळी काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. काँग्रेसने लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची टीका भाजपने केली आहे. आम आदमी पक्षानेही काँग्रेसवर टीका केली आहे.