देशातील कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या क्रांतिकारकांना अद्याप शहीद हा दर्जा देण्यात आलेला नाही. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. याबद्दल भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय इतिहास संशोधन परिषदेने नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमध्येही या तीन क्रांतिकारकांचा उल्लेख कट्टरतावादी तरुण आणि दहशतवादी म्हणून करण्यात आला आहे.

देशासाठी हसत हसत फासावर चढलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तरुण क्रांतिकारकांचा उल्लेख होताच आजही देशातील कोट्यवधी तरुणांचे रक्त सळसळते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देतानाही मागेपुढे न पाहणाऱ्या या क्रांतिकारकांबद्दल सर्वांच्याच मनात अतिशय आदर आहे. त्यामुळेच या क्रांतिकारकांबद्दल मिळालेल्या माहितीने आरटीआय कार्यकर्ते रोहित चौधरी यांना धक्काच बसला. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना शहिदांचा दर्जा देण्यात आला आहे का?, असा प्रश्न त्यांनी आरटीआयमधून विचारला होता. मात्र आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी या तरुण क्रांतिकारकांकडे दुर्लक्ष केल्याचेच आरटीआयमधून समोर आले. ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

भारतीय इतिहास संशोधन परिषद विभाग मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. या परिषदेच्या अध्यक्षांची नेमणूक केंद्र सरकारकडून केली जाते. सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. त्याआधी या खात्याची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे होती. मात्र या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या पुस्तकांमध्ये क्रांतिकारकांचा उल्लेख कट्टरतावादी तरुण आणि दहशतवादी म्हणून करण्यात आला आहे.

याआधीही भगतसिंग यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केल्याने वाद झाला होता. गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठाने इतिहासाच्या एका पाठ्यपुस्तकात भगतसिंग यांचा उल्लेख क्रांतिकारक-दहशतवादी म्हणून करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे नाव ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ असे आहे. गेल्या दोन दशकांपासून हे पाठ्यपुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. या पुस्तकातील २० व्या धड्यात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन यांचा उल्लेख क्रांतिकारक दहशतवादी म्हणून करण्यात आला आहे.