दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्याकडे असलेल्या पुराव्यांमुळेच त्यांनी युगांडातील महिलेच्या निवासस्थानी छापा टाकल्याचा खुलासा आम आदमी पक्षाने शुक्रवारी केला. युगांडातील महिलेच्या निवासस्थानी वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या संशयावरून भारती यांनी आपल्या समर्थकांसह छापा टाकला होता. यानंतर संबंधित महिलेने भारती यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार पोलीसांकडे केली. या संपूर्ण प्रकारावरून सोमनाथ भारती यांच्या राजीनाम्याची मागणीने गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला आहे.
भारती यांच्याकडे संबंधित महिलेविरुद्ध पुरावे असल्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी तिच्या निवासस्थानी छापा टाकला होता, असा खुलासा आम आदमी पक्षाने केला. दरम्यान, पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी भारती यांनी संबंधित महिलेच्या निवासस्थानी छापा का टाकला, याचा खुलासा करणारे पुरावे लोकांसमोर ठेवले नाहीत, ही पक्षाची चूकच झाली, असे म्हटले आहे. भारती यांनी त्यांच्याकडील सर्व पुरावे लोकांसमोर ठेवायला पाहिजे होते. पुरावे न मांडल्यामुळे लोकांचा झालेला गैरसमज ४-५ दिवस तसाच राहिला, ही चूक झाली, असे त्यांनी कबुल केले. ‘सीएनएन-आयबीएन’वरील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.