मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोनच तासांत कमलनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली. अधिकार प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईल्सवर त्यांनी सोमवारी सह्या केल्या. तसेच राज्यात गोशाळा निर्माण करण्याच्या फाईलवरही त्यांनी सही केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन त्यांनी तंतोतंत पाळल्याची चर्चा आहे.

आज दुपारी कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मध्य प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास १० दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु.

कमलनाथ यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू उपस्थित होते.