मुलं चोरी करण्याच्या अफवांचं पेव आता कर्नाटकातही पोहोचलं असून येथे गुगलच्या एका इंजिनीअरला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात ही घटना घडली. मुलं चोरी करण्याच्या अफवेवरुन येथे जमावाने हैदराबादच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने मुलं चोरी करण्याच्या संशयातून ३२ वर्षांच्या मोहम्मद आजम अहमद या ३२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा जीव घेतला. हैदराबादच्या मलकपेट येथे राहणारा मोहम्मद आजम हा गुगलमध्ये इंजिनिअर होता. मोहम्मद हा बिदरच्या मुरकी येथे राहणाऱ्या बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी आला होता.

मित्रांची भेट घेऊन परतताना त्यांच्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. त्याचवेळी व्हॉट्सअॅपवर मुलं चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र जमून या चारही जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, बिदरच्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्वतः गर्दीत घुसून जमावाला पांगवले आणि या तरुणांना जमावाच्या ताब्यातून सोडवलं. चौघंही गंभीर जखमी होते, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला होता. तर नूर मोहम्मद, मोहम्मद सलमान आणि सलहम इदाल कुबेसी हे गंभीर जखमी असूम त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर मुल चोरी झाल्याची अफवा पसरविणाऱ्या ग्रुप अॅडमिनलाही अटक करण्यात आली आहे. शिवाय व्हॉट्सअॅपवर मुलं चोरी झाल्याचे बनावट फोटो टाकणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.