सलग दुसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे. ट्रम्प यांचा व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्याचा मार्ग खडतर बनत चालला आहे. एडिसन रिसर्चनुसार पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात काटे की टक्कर सुरु आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये आधी ट्रम्प आघाडीवर होते. आताही ते आघाडीवर आहेत. पण आता निसटती आघाडी त्यांच्याकडे आहे. ट्रम्प यांच्याकडे ४९.५ टक्के मते आहेत तर बायडेन यांच्याकडे ४९.२ टक्के मते आहेत.
त्याशिवाय जॉर्जियामध्ये ट्रम्प यांचे मताधिक्य १८०० मतांनी कमी झाले आहे. दरम्यान पेनसिल्व्हेनियामध्येच आणखी १७०० बॅलेट्स आहेत. अमेरिकन पोस्टल सेवेने ही माहिती दिली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल व्होटसचे बहुमत आवश्यक आहे. सध्या डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्याकडे २६४ इलेक्टोरल मते आहे. त्यांना अजून सहा मतांची आवश्यकता आहे.
त्यासाठी त्यांना आणखी एका राज्यात विजय मिळवावा लागेल. नेवाडा, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या चार राज्यांपैकी बायडेन यांना एक राज्य जिंकावे लागेल. बायडेन नेवाडात आघाडीवर आहेत तर जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनियामध्ये पिछाडी भरुन काढण्याच्या जवळ पोहोचले आहेत. ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल व्होटस आहेत. राष्ट्राध्यक्षपद कायम राखण्यासाठी त्यांना चारही राज्ये जिंकावी लागतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 12:17 pm