अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत राजकीय अनिश्चितता कायम असली, तरी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. अटीतटीच्या राज्यात मतमोजणी पूर्ण झाली नसली, तरी शुक्रवारी जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या महत्त्वाच्या राज्यांमध्ये बायडेन यांनी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी  घेतली. टपाली मतांची मोजणी हा गैरप्रकार असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले असले, तरी त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाची शक्यता बऱ्यापैकी धूसर बनलेली दिसून येते.

भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजेपर्यंत जो बायडेन जॉर्जियामध्ये हजारहून अधिक मतांनी तर पेनसिल्वेनियामध्ये सहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते. ही आघाडी वरकरणी लहान वाटली, तरी दोन दिवसांनंतर बायडेन यांनी पिछाडी भरून काढलीच, शिवाय दोन्ही राज्यांमध्ये उर्वरित टपाली मते डेमोक्रॅटिक प्रभावक्षेत्रांतून यावयाची असल्यामुळे बायडेन यांचे पारडे या दोन मोक्याच्या राज्यांमध्ये जड दिसते. दोन्ही राज्यांमध्ये मिळून ३६ प्रातिनिधिक मते असून, ही राज्ये जिंकल्यास बायडेन ३००चा टप्पाही ओलांडू शकतात.

या राज्यांमध्ये अनुक्रमे ९५ टक्के आणि ९९ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अ‍ॅरिझोना राज्यात ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून, या ठिकाणी बायडेन ४७ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते. नेवाडा राज्यात बायडेन ११ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर होते. दोन्ही राज्यांमध्ये त्यांची आघाडी निर्णायक मानली जात आहे. अ‍ॅरिझोनाच्या ११ प्रातिनिधिक मतांमुळे बायडेन यांची प्रातिनिधिक मते २५३वरून २६४वर सरकली. पुढील काही तासांमध्ये नेवाडातही (६ प्रातिनिधिक मते) ते विजयी झाले, तरी २७०चा जादुई आकडा ते गाठू शकतील.

ट्रम्प अलास्का आणि नॉर्थ कॅरोलिना या दोन राज्यांमध्ये आघाडीवर असले, तरी विजयासाठी त्यांना जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया ही राज्ये जिंकावी लागतील.

दरम्यान ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार चमूने काही ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेवर तर काही ठिकाणी टपाली मतांच्या मोजणीवर आक्षेप घेत दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मिशिगनच्या न्यायाधीशांनी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली आव्हान याचिका फेटाळली आहे. मतदान दिवसापूर्वी करण्यात आलेल्या मतदानाचा मोजणीत समावेश करण्याच्या विरोधात ही याचिका होती.

स्थिती काय?

* अ‍ॅरिझोना राज्यात बायडेन यांचा विजय निश्चित, त्यामुळे त्यांची प्रातिनिधिक मते २६४

* नेवाडापाठोपाठ पेनसिल्वेनियातही बायडेन आघाडीवर

* बायडेन आघाडीवर असलेल्या जॉर्जियात पुन्हा मतमोजणी

ट्रम्प यांच्यावर माध्यमे, स्वपक्षीयांकडूनही टीका

मोक्याच्या राज्यांमध्ये पिछाडीवर पडत असल्याची कुणकुण लागताच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बिथरले आणि त्यांनी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत डेमोक्रॅटिक पक्ष आणि माध्यमांवर आरोपांचा वर्षांव केला. त्यामुळे वैतागून अमेरिकेतील बहुतेक वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या बेताल बडबडीचे प्रक्षेपणच थांबवले. ट्रम्प यांच्या पक्षातील काही लोकप्रतिनिधी, तसेच रिपब्लिकन पक्षाचे जुनेजाणते वकील बेंजामिन गिन्सबर्ग यांनीही ट्रम्प यांना पराभव मान्य करण्याचा सबुरीचा सल्ला दिला. ट्रम्प यांनी अमेरिकेतील घटनात्मक संस्थांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि अनावश्यक असल्याचे मत या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.