पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीप्रसंगी परिधान केलेला वादग्रस्त बंदगळा सूट येथील लिलावात शुक्रवारी सायंकाळअखेर ४.३१ कोटी रूपयांना विकला गेला आहे. हा टू पीस सूट असून तो विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. नेव्ही ब्लू रंगाचा हा सूट असून तो सुरतचे हिरे व्यापारी लालजी पटेल व त्यांच्या मुलाने सर्वोच्च बोली लावून घेतला आहे. या सूटची किंमत १० लाख होती व त्याला आता एवढी मोठी किंमत आली आहे.
धर्मानंद हिरे कंपनीचे मालक लालजी पटेल व त्यांचे पुत्र हितेश पटेल यांनी ४.३१ कोटी रूपयांना हा सूट खरेदी केला, असे जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार यांनी सांगितले. लिलावाची प्रक्रिया तीन दिवस चालू होती, ती शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपली. शेवटच्या तासात लिलावाच्या ठिकाणी बराच गोंधळही झाला व बोली वाढत गेली. खरेतर या सुटाची नेमकी किंमत कुणालाही माहीत नाही, तरी तो १० लाखांचा असल्याचे मानले जाते. या सूटवर ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे नाव सोनेरी विणकाम करून कोरलेले आहे. बुधवारी ११ लाखांपासून त्याची बोली सुरू झाली होती.

जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार यांनी सांगितले की, पाच वाजेनंतर पाच कोटींची बोलीही आली होती, पण वेळ संपल्याने ती नाकारण्यात आली. आनंदित झालेले लालजी पटेल यांनी सांगितले की, आपण देशासाठी काही करू इच्छितो, लिलावामुळे ती संधी मिळाली. हा सूट आपल्याला मिळेल,  असे वाटले नव्हते. अनेकांची तो खरेदी करण्याची इच्छा होती. हा पैसा गंगा स्वच्छतेसाठी जाणार आहे. त्यामुळे आपण बोली लावली. त्यांचे पुत्र हितेश यांनी सांगितले की, गंगेशी आमचे वेगळे नाते आहे, त्यामुळे आम्ही पैसा खर्च करण्यास तयार झालो. आता तो पैसा गंगेसाठी वापरला जाईल. हा सूट दुरूस्त करून परिधान करू व नंतर ‘धर्मानंद डायमंड्स’ या आमच्या कुटुंबाच्या हिरे कारखान्यात तो स्वागत कक्षात ठेवला जाईल.