बिहार विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपा आणि राष्ट्रीय जनता दलाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. राष्ट्रीय जनता दलाने जेहानबादची जागा कायम ठेवण्यात यश मिळवले असून भाजपाने भाबुआमध्ये विजय मिळवला.जेहानाबादमधून राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या कुमार कृष्णा मोहन यांनी विजय मिळवला. कृष्णा मोहन यांचे वडिल मुनद्रिका यादव यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली होती.

उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमध्येही अरारिया लोकसभा पोटनिवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपाला झटका दिला. राजद उमेदवार सरफराझ आलमने भाजपाच्या प्रदीप कुमार सिंह यांचा ६१,७८८ मतांनी पराभव केला. भाजपा उमेदवाराला ४ लाख ४७ हजार ५४६ मते मिळाली. राजद उमेदवाराला ५ लाख ९ हजार ३३४ मते मिळाली.

भाबुआमधून भाजपाच्या रिंकी राणी पांडे यांनी विजय मिळवला. पती आनंद भूषण पांडे यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली होती. बिहारमधल्या या विधानसभा-लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जदयू-भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या राजद-काँग्रेस यांची आघाडी आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस बरोबरची आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मोहम्मद तसलीमुद्दीन यांच्या निधनामुळे अरारीयामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. राजदने इथून तसलीमुद्दीन यांचा मुलगा सरफराझ आलम याला तिकिट दिले आहे. भाजपा उमेदवार प्रदीप सिंह आणि राजद उमेदवारामध्ये इथे मुख्य लढत आहे. २००९ मध्ये प्रदीप सिंह अरारीयामधून जिंकले होते पण २०१४ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.