बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत असताना उर्वरित टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. पश्चिम चंपारण्य येथे झालेल्या जाहीरसभेत सभेत कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?,” असा सवाल राहुल गांधी यांनी मतदारांना केला.

राहुल गांधी यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह पश्चिम चंपारण्य येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले,”एरवी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. पण यावेळी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानींचे पुतळे जाळण्यात आले. या दसऱ्याला संपूर्ण पंजाबात नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचे पुतळे जाळले गेले. ही वाईट गोष्ट आहे, पण शेतकरी त्रस्त आहे म्हणून हे घडलं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

आणखी वाचा- राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

“बिहारमधील लोकांना दिल्ली, हरयाणा, बंगळुरूमध्ये रोजगार मिळतो, पण बिहारमध्ये मिळत नाही. कारण नितीश कुमार व नरेंद्र मोदी यांच्यामुळे. रॅलीतील दीपक गुप्ता नावाच्या तरुणाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, मोदीजींनी दीपक गुप्ताला नोकरीवरून काढून टाकलं. राहुल यांनी दीपकला विचारलं, दिल्लीत काय काम करत होता? त्यानं सांगितलं, मेट्रोमध्ये. राहुल गांधी म्हणाले, बिहारमध्ये तुला काम का मिळालं नाही, कारण बिहारमध्ये मेट्रोचं नाही”, असं म्हणत राहुल गांधी यांनी नितीश कुमार मोदींना टोला लगावला.

आणखी वाचा- निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

“मोदी खोटं बोलतात. आधी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन २ कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केलं, तर लोक त्यांना हाकलून लावतील. आम्ही रोजगार देण्याची माहिती आहे. विकास करणं आम्हाला माहिती आहे. आमच्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती मी स्वीकारतो. आम्हाला खोटं बोलणं माहिती नाही. याबाबती आमची मोदींशी स्पर्धाच नाही,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.