भाजपचे काँग्रेसला आव्हान

नवी दिल्ली : काँग्रेसने काश्मीरचा विशेष दर्जा पुनस्र्थापित करण्याच्या मागणीचे समर्थन केल्यानंतर शनिवारी भाजपने टीकेचा भडिमार केला. बिहारमध्ये मते मिळवण्यासाठी काँग्रेसचे नेते विभाजनवादी विधाने करत आहेत. हिंमत असेल तर काँग्रेसने बिहारच्या जाहीरनाम्यात अनुच्छेद ३७०चा उल्लेख करावा, असा शाब्दिक हल्ला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.

काश्मीरला अनुच्छेद ३७० नुसार दिलेला विशेषाधिकार पुन्हा मिळावा यासाठी जम्मू-काश्मीरमधील मुख्य राजकीय पक्ष ‘गुपकार ठरावा’द्वारे एकत्र आले आहेत. त्याला पाठिंबा देणारे ट्वीट माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. काश्मीरचा विशेषाधिकार पुनस्र्थापित करण्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. हा अधिकार केंद्र सरकारने मनमानी पद्धतीने काढून घेतला असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

‘जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विकास होत असल्याचे लोकांना दिसत आहे, तरीही काँग्रेस विभाजनवाद्यांची भाषा बोलत आहे. काँग्रेसचे विचार संकुचित होऊ  लागले असल्यानेच लोकांच्या भावनांच्या विरोधात ते भूमिका घेत आहेत’, अशी टीका जावडेकर यांनी केली.

‘दहा लाख युवकांना रोजगार’

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने शनिवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. सत्तेवर आल्यास १० लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे, तसेच केंद्र सरकारने अलीकडेच लागू केलेले नवे कृषी कायदे  राज्यात लागू केले जाणार नाहीत असे आश्वासन त्यांनी दिले आहे. महाआघाडी निवडून आल्यास सर्वप्रथम १० लाख सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेस मंजुरी दिली जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला व महाआघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत ‘बदलाव का संकल्प’ हा जाहीरनामा जारी करताना राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले.