दिल्लीतील लाजीरवाण्या पराभवाने आधीच घायाळ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांना आता पक्ष परिवारातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रश्न विचारले असून, त्यांच्याकडून खुलासे मागण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांना गुरुवारी ‘केशव कुंज’वर बोलावून घेण्यात आले होते. यावेळी त्यांना दिल्लीतील पराभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
प्रक्षोभक वक्तव्यांचा भाजपला फटका?
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ‘चोर’ असल्याचा उल्लेख प्रचारावेळी निर्मला सितारामन यांनी केला होता. इतक्या नकारात्मक पद्धतीने प्रचार का करण्यात आला, याचा खुलासा निर्माल सितारामन यांच्याकडून मागण्यात आला. भाजपच्या नकारात्मक प्रचारामुळेच दिल्लीकरांनी त्यांना नाकारल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
स्मृती इराणी यांच्या ‘अॅटिट्यूड’बद्दल संघातील अनेक जणांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. काही शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनीही त्यांच्या ‘अॅटिट्यूड’बद्दल तक्रार केली होती. त्याबद्दल स्मृती इराणींकडे प्रश्न विचारण्यात आले.
अनुत्तीर्णाचा आनंद
भाजपचे काही केंद्रीयमंत्री आणि नेते निवडणुकीच्या काळात उद्दामपणे वागल्याच्या तक्रारीही संघाकडे करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भाजपच्या दिल्लीतील काही नेत्यांना प्रचाराच्या काळात जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते, अशीही तक्रार करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली निवडणुकीतून धडा घेऊन पुढील काळात सरकार आणि पक्षाच्या पातळीवर चांगले काम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठीच संघाकडून विविध भेटीगाठी घेण्यात आल्याचे समजते.