News Flash

Delhi Headquarters : मोदी सरकारच्या हालचाली; मुख्यालयासह ‘ते’ बंगलेही करणार काँग्रेसमुक्त

नगरविकास मंत्रालयाचे संकेत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी. (संग्रहित)

काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिल्लीतील बंगले काँग्रेसमुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला मध्य दिल्लीतील मुख्यालय सोडावे लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राजधानी दिल्लीतील २४ अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयासह चार बंगल्यांवर अवैधरित्या कब्जा केला आहे, असे केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

दिल्लीतील ५ रायसिना रोड, २६ अकबर रोड आणि सी-२/१०९ चाणक्यपुरी येथील तीन बंगले सध्या काँग्रेसच्या कब्जात आहेत. त्यातील रायसिना रोडवरील बंगला युवक काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर २६ अकबर रोड आणि चाणक्यपुरीतील बंगल्यातून काँग्रेसचे कामकाज चालते. या सर्व बंगल्यांवर काँग्रेसने अवैधरित्या कब्जा केला आहे. त्यामुळे येत्या काळात हे चारही बंगले काँग्रेसला सोडावे लागण्याची शक्यता आहे. तशा हालचाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सुरू केल्या आहेत. काँग्रेसला २०१० मध्ये दिल्लीत पक्षाचे कार्यालय भवन बांधण्यासाठी जमीन देण्यात आली होती. २६ जून २०१३ रोजी त्याचे हस्तांतरण रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली आहे. जमिनीचा ताबा घेतल्यानंतर काँग्रेसला तीन वर्षांच्या आत भवन बांधणे बंधनकारक होते, तसेच चार बंगले २०१३ पर्यंत रिकामे करायचे होते, अशी माहितीही नगरविकास मंत्रालयाने दिली आहे. काँग्रेसने यासाठी अतिरिक्त तीन वर्षांचा कालावधी देण्यात यावा, अशी विनंतीही केली होती, असेही मंत्रालयाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. याशिवाय २६ जून २०१३ रोजी परवाना शुल्काच्या स्वरुपात देण्यात येणाऱ्या भरपाईच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचीही विनंती केली होती, अशी माहितीही मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, राजकीय पक्षांना स्वस्त दरात मिळणाऱ्या बंगल्यांच्या तुलनेत त्याचा बाजार भाव खूपच जास्त असून, काँग्रेसने अनेक वर्षांपासून या बंगल्यांवर अवैधरित्या कब्जा केल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 11:37 am

Web Title: bjp government may eviction congress from its delhi headqaurters
Next Stories
1 Paytm वापरताय? मग हे न विसरता वाचा…
2 लेफ्टनंट उमर फयाजच्या हत्येनंतर काश्मीरच्या बीएसएफ टॉपरला दहशतवाद्यांकडून धमकी
3 हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटालांची कमाल, ८२ व्या वर्षी तुरूंगातून बारावीची परीक्षा पास
Just Now!
X