भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे सरकार आहे. तिथे विकासाची कामे सुरू असल्याचे पाहायला मिळते. आम्ही ओडिशामध्ये सत्तेत नाही आणि त्यामुळे इथल्या लोकांचे प्रश्न सगळ्यांना दिसताहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप हाच विकासाचा समानार्थी शब्द असल्याचे म्हटले आहे.
ओडिशामधील बालासोरमध्ये एका जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी आले होते. ओडिशामध्ये मोदी यांनी तिसऱ्यांदा जाहीर सभा घेतली. त्यांच्या सभेसाठी हजारो नागरिक येथील एम्स मैदानावर जमले होते.
मोदी म्हणाले, ओडिशामधील अनेक गावांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीपासून वीज पोहोचलेली नाही. आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर १००० दिवसांमध्ये येथील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. ज्यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी माझी पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यावेळीच माझे सरकार हे केवळ देशातील गरिबांसाठी काम करेल, असे आश्वासन मी सर्वांना दिले होते. देशातील श्रीमंत वर्ग सरकारवर अवलंबून नाही. पण गरिब जनता सरकारवरच अवलंबून आहे. याची मला जाणीव आहे. जर देशातील लोकांना आपल्या सरकारवर विश्वास असेल, तर देशाची प्रगती दुप्पट वेगाने होऊ शकते, असेही आपल्याला वाटते, असे त्यांनी सांगितले.
ओडिशामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असूनही आज हे राज्य महाराष्ट्र किंवा गुजरातसारखे प्रगतीशील का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी देशातील गरिबांसाठी सरकारच्या विविध निर्णयांची माहिती सभेमध्ये दिली.