लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाने सर्वच खासगी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरचे बुकिंग केल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेता आनंद शर्मा यांनी केला आहे. भाजपाने सर्वच खासगी विमानं आणि हेलिकॉप्टर आरक्षित केल्यामुळे काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मंगळवारी आनंद शर्मा म्हणाले.

‘निवडणूक सामग्रीच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजपात अजिबात स्पर्धा नाहीये, कारण सर्व सामग्री सत्ताधारी पक्षाकडे आहे. त्याबाबतीत आम्हीच काय पण कोणताच राजकीय पक्ष त्यांना टक्कर देऊ शकत नाही. याशिवाय, भाजपाने जाहिरातींवर आणि प्रचारावर आतापर्यंत 4 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. इतका खर्च नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांनीही आपल्या जाहिरातींवर केला नाही’, असा आरोपही शर्मा यांनी केला.

‘जरी निवडणूक सामग्रीच्या बाबतीत आम्ही भाजपाला टक्कर देऊ शकत नाही, तरीही देशातील जनतेच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव नक्की करु’ असा विश्वासही शर्मा यांनी व्यक्त केला.