भाजपची आर्थिक धोरणे प्रतिगामी असून, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही, अशा शब्दांत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीकास्त्र सोडले. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत ते बोलत होते.
काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास राहुल गांधीच पंतप्रधान होतील. मात्र सद्य:स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणे कठीण आहे, असे भाकीत त्यांनी वर्तवले. आम आदमी पक्षावरही चिदंबरम यांनी टीका केली. भारतात पक्षीय लोकशाहीला स्थान आहे, झुंडीची लोकशाही स्वीकारली जाणार नाही, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांच्या आंदोलनावर टीका केली.
भाजपचे देशभर अस्तित्वही नाही. भाजपची धोरणे देशाच्या एकतेच्या कल्पनेच्या विरोधी असल्याची टीका करून, त्यांची आर्थिक धोरणे संधिसाधू असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला. एकीकडे किरकोळ व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला रोजगार बुडतील म्हणून ते विरोध करतात. वस्तुस्थिती मात्र याच्या उलटी असल्याचे चिदंबरम यांनी निदर्शनास आणून दिले. गरिबांना अन्न मिळत नसतानाही सार्वजनिक वितरण व्यवस्थेला भाजप विरोध करतो. सुधारणांना भाजपचा विरोध कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. निर्गुतवणुकीच्या मुद्दय़ावरही भाजपने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात यामुळे आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा त्यांनी केला. या आर्थिक वर्षांत निर्गुतवणुकीच्या माध्यमातून चाळीस हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.