परवेश वर्माकडून राजीव गांधींचा उल्लेख ‘राजीव फिरोज खान’

नवी दिल्ली: वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांमुळे प्रचार करण्यावर बंदीची नामुष्की ओढवून घेतलेल्या भाजप खासदार परवेश वर्मा यांना सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चच्रेवर प्रारंभिक भाषण करण्याची मुभा भाजपने दिली. सत्ताधारी पक्षाच्या या कृतीमुळे भाजपचे नेतृत्व परवेश वर्मा यांच्या पूर्णत: पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले.

लोकसभेत अभिभाषणाच्या चच्रेवरील भाषणातदेखील वर्मा यांनी वादग्रस्त विधाने केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख वर्मा यांनी ‘राजीव फिरोज खान’ असा केला. हे राजीव फिरोज खान यांचे सरकार नाही, मोदी सरकार आहे. आम्ही कधीही नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेणार नाही. शाहीन बागेतील आंदोलक मोदी-शहांना मारण्याची भाषा करत आहेत. आंदोलकांना जिहाद पाहिजे. स्वातंत्र्य हवे असल्याची मागणी ते करत आहेत. आंदोलक पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत आहेत. आसाम आणि काश्मीरला देशापासून वेगळे करण्याचा घाट घातला जात आहे, अशी विधाने वर्मा यांनी केली. वर्मा यांनी विरोधकांना ‘जय श्रीराम’चा नारा द्यायलाही सांगितले. वर्मा भाषणासाठी उभे राहताच थोडी तरी ‘लाज बाळगा’, अशी नारेबाजी विरोधकांनी केली. त्यानंतर त्यांनी सभात्याग केला.

अनुराग ठाकूर विरोधकांचे लक्ष्य

लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना लक्ष्य केले. अर्थमंत्रालयासंबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ठाकूर उभे राहताच विरोधकांनी ‘गोळी मारणे बंद करा, देश तोडणे बंद करा’ अशी घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेण्याची, तसेच नागरिकत्व नोंदणी सूची तसेच राष्ट्रीय लोकसंख्या सूचीचे कामही थांबवण्याची मागणी लावून धरली. सभागृहातील गोंधळ वाढल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे सभागृह दोनदा तहकूब करावे लागले.

गोळीबारावरून गोंधळ

जामियाच्या आंदोलकांवर तरुणाने केलेल्या गोळाबारावरून लोकसभेत गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक उत्तर देत असताना ‘एमआयएम’चे खासदार असादुद्दिन ओवेसी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

केंद्र सरकार जामियाच्या विद्यार्थी आंदोलकांवर अत्याचार करत आहे. आम्ही (विरोधक) या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहोत हे सरकारला स्पष्टपणे सांगू इच्छितो.. एका विद्यार्थ्यांने डोळा गमावला आहे हे सरकारला माहिती आहे का? विद्यार्थिनींना मारहाण झाली.. गोळीबार करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असे ओवेसी म्हणताच सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी त्यांना विरोध केला.

राज्यसभेतही गदारोळ

वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून नागरिकत्व नोंदणी सूचीवर चर्चा करण्याची मागणी केली, पण ती फेटाळण्यात आली. काँग्रेससह द्रमुक, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, सप, बसप अशा बहुतांश विरोधी पक्षांनी चच्रेची नोटीस दिली होती. नागरिकत्व दुरुस्ती, नोंदणी सूची, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यावरून होत असलेल्या विरोधाला केंद्र सरकार हिंदू-मुस्लीम असा धर्माचा मुद्दा बनवत आहे, पण वास्तव तसे नाही, असे आझाद म्हणाले. राज्यसभाही दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.