News Flash

राहुल गांधींची कीव करावीशी वाटते; भाजपचा पलटवार

संघ, भाजपवरील टीकेला प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘देशातील बहुसंख्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र हे राहुल गांधी यांना अद्याप समजलेले नाही. त्यामुळे मला राहुल गांधींची कीव करावीशी वाटते,’ अशा शब्दांमध्ये प्रसाद यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी पंतप्रधान मोदींसह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

‘संघाच्या विचारधारेच्या बळावर भाजपला सत्ता मिळू शकत नाही, याची संघाला जाणीव आहे. त्यामुळेच सत्तेचा वापर करुन संघाच्या माणसांची नेमणूक देशातील महत्त्वाच्या संघटनांमधील मोक्याच्या जागांवर केली जात आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी भाजप आणि संघावर हल्ला चढवला होता. राहुल गांधींच्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ‘देशातील लोक संघाचा आदर करतात. आज देशातील ७० टक्के लोकांवर भाजपचे राज्य आहे. मात्र राहुल गांधी यांना हे समजत नाही. त्यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

‘एका बाजूला देश लुटणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला देश वाचवणारे आहेत, असे राहुल गांधी म्हणतात. राहुल गांधींच्या या विधानात तथ्य आहे. देशाला लुटणाऱ्या लोकांना जनतेने सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे,’ असे म्हणत प्रसाद यांनी राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवली. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही शरसंधान साधले होते. ‘सत्तेत आल्यावर संघाला झेंडावंदन करण्याची आठवण झाली,’ अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधींनी संघ आणि मोहन भागवत यांना लक्ष्य केले होते. राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना प्रसाद यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा उल्लेख केला. ‘राहुल गांधींच्या आजींनी आणीबाणीच्या काळात वचनबद्ध न्यायसंस्थेचा उल्लेख केला होता. त्यामुळे राहुल गांधींनी याबद्दल भाष्य करणे शोभत नाही,’ असे म्हणत प्रसाद यांनी पलटवार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 4:47 pm

Web Title: bjp leader ravi shankar prasad slams congress vice president rahul gandhi
Next Stories
1 इशरत जहाँ प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांचे राजीनामे
2 चंदीगडमध्ये १० वर्षीय बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म
3 फक्त दोनच व्यक्ती देश चालवताहेत, अहमद पटेल यांची टीका
Just Now!
X