दिवंगत नेते करूणानिधींचा मुलगा अळगिरी गुंड आहे पण स्टॅलिनही काही साधू-संत नसल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये दुही माजल्याचे दिसत आहे. अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यात पक्षातील वर्चस्वावरून मतभेद सुरू आहेत यावरून त्यांनी अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यावर टीका केली. तसेच स्टॅलिन यांची पक्षावर पकड असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

तामिळनाडूमध्ये सध्या करूणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन आणि एम के अळगिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरून मतभेद सुरू झाल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. यावर स्वामी म्हणाले, मुलांमध्ये इर्षा असते. एक जण चांगलं काम करत असेल तर दुसरा त्याच्यावर जळणारच. अळगिरी तर राजकारणी नाही. तो एक गुंड आहे. जमीन हडप करणे, धमकावणे, खून करणे हेच त्याचे काम असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

स्टॅलिनपण काही देव नाही, साधूसंत नाही. पण संघटनेत त्याची पकड आहे. त्यांनी संपूर्ण जीवन फक्त संघटना मजबूत करण्यासाठी दिले आहे. वडिलांबरोबर बैठकांचे आयोजन करणे त्याला उपस्थिती दर्शवणे आदी कामे ते करत. पक्ष त्यांच्याबरोबर राहील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुब्रमण्यम स्वामी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला जाऊ इच्छिणारे काँग्रेस नेते पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. सिद्धूचे मानसिक संतुलन ढासळले असल्याची टीका त्यांनी केली होती.