भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर दानवेंनी दिल्लीत याबाबत घोषणा केली आहे.  त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निडवणुकांमध्ये भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने नवा प्रदेशाध्यक्ष नेमून त्याच्याकडे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सोपविली जाईल.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली असली तरी पक्षांतर्गत निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मुदतवाढ मिळाली होती.

दानवे यांना २०१४ मध्येही मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले होते. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने दानवे यांची जानेवारी २०१५ मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता देशात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.