भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने किंवा त्यांची अरेरावी ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठांनी समजावून , प्रसंगी खडसावूनसुद्धा काही भाजप नेत्यांच्या वर्तणुकीत तसूभरही फरक पडलेला नाही. त्यामध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळालेल्या उत्तर प्रदेशात तर भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते तर जवळपास हवेतच आहेत. त्यामुळे अनेक नेते प्रशासकीय व्यवस्थेला भीक घालत नसल्याचे दिसत आहे. त्यांच्या या अरेरावीची मजल कुठपर्यंत गेली आहे याची झलक रविवारी गोरखपूर येथे पाहायला मिळाली. या ठिकाणी  एका आंदोलनाच्यावेळी भाजपच्या आमदाराने खूप झापल्याने महिला पोलीस अधिकाऱ्याला रडू अनावर झाले.

काल दुपारी कोईलवा गावातील स्थानिक परिसरात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्रीच्याविरोधात आंदोलन करत होते. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने अवैध दारुविक्री राजरोस चालते, असा या स्थानिकांचा आक्षेप होता. त्यासाठी हे गावकरी आंदोनल करत असतानाच तणाव निर्माण झाला. यावेळी काही महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी लाठीमार केला. आंदोलकांनी आमच्यावर दगडफेक केल्यामुळे आम्हाला लाठीमार करावा लागला, असा दावा यावेळी पोलिसांनी केला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक आमदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल याठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी येथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी चारू निगम यांना असे काही झापले की चारू निगम यांना आपले अश्रू अनावर झाले. चारू निगम या २०१३च्या आयपीएस  तुकडीच्या अधिकारी असून त्या सध्या उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, सदर घटनेचा व्हिडिओ पाहता कालचा अनुभव चारू निगम यांच्यासाठी निश्चितच वाईट ठरला, असे म्हणावे लागेल. या व्हिडिओमध्ये अग्रवाल चारू निगम यांना झापताना दिसत आहेत. “मी तुमच्याशी बोलतंच नाहीये, तुम्ही मला काही सांगूच नका. तुम्ही एकदम शांत बसा, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,” असे राधामोहन अग्रवाल बोलताना दिसत आहेत. त्यावर चारू निगम यांनीदेखील अग्रवाल यांना प्रत्युत्तर दिले. मी येथील प्रमुख अधिकारी आहे, मी काय करतेय हे मला माहिती आहे, असे निगम यांनी म्हटले. हा सगळा प्रकार सुरू असतानाच चारू निगम यांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. यावेळी चारू यांना अक्षरश: आपले अश्रू अनावर झाले. व्हिडिओमध्ये वरिष्ठ आल्यानंतर चारू निगम खिशातील रूमाल काढून स्वत:चे डोळे पुसताना दिसत आहेत.

या घटनेनंतर साहजिकच राधामोहन अग्रवाल यांच्याबद्दल चर्चेताल सुरूवात झाली. मात्र, मी महिला अधिकाऱ्याशी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. आम्ही या ठिकाणी दारूच्या दुकांनाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईच्याविरोधात आहोत. त्याविरोधात लोक शांतपणे आंदोलन करत होते. मात्र, तरीही महिला पोलीस अधिकाऱ्याने बळाचा वापर करून या आंदोलकांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. अनेक महिलांना चोप देण्यात आला. एका ८० वर्षांच्या वृद्धेला तर फरफटत नेण्यात आले. ही कृती बिलकूल खपवून घेण्यासारखी नाही, असे सांगत राधामोहन अग्रवाल यांनी आपली बाजू मांडली.