भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उदयभान चौधरी असं या भाजपा आमदाराचं नाव आहे. उदयभान चौधऱी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. उदयभान चौधरी धमकावत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करु लागले आहेत.

‘तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे ? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का ? लोकशाहीची ताकद कळली नाही का ?’, अशा शब्दांत उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहे.

उदयभान चौधरी फतेहपूर-सिकरीचे आमदार आहेत. आग्रा येथील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ते उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांकडे गेले होते. आमदार धमकावत असताना तिथे उपस्थित समर्थक महिला अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी करु लागले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयभान चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत माफी मागण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. उप-विभागीय दंडाधिकारी लोकांचं गाऱ्हाणं ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांनी उदयभान चौधरींनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.