उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी अनेक केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या राज्यांमधील राजकीय समीकरणे आणि कारभार याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा, राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, स्मृती इराणी आणि किरेन रिजिजू या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेते बैठकीला हजर होते. या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत प्रामुख्याने चर्चा झाली, असे बैठकीनंतर एका नेत्याने सांगितले.

यापैकी पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, पुढील निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी लक्षणीय व्हावी यासाठी भाजपचे नेते बैठकांचे आयोजन करीत आहेत. भाजपच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे.