12 December 2017

News Flash

जयच्या कंपनीत भ्रष्टाचार नाही, उलट कंपनीचे नुकसानच : अमित शहा

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले.

नवी दिल्ली | Updated: October 13, 2017 2:46 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

मुलाच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याचे समोर आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुलाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. मुलाच्या कंपनीत कोणताही अनागोंदी कारभार झालेला नाही. जयने सरकारी पैसा घेतला नाही किंवा जमीनही घेतलेली नाही, त्यामुळे यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही, असेही शहा यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या ‘टेम्पल इंटरप्रायझेस लिमिटेड’ या कंपनीची उलाढाल एका वर्षात ८० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याने खळबळ निर्माण झाली. या प्रकरणात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादावर भाष्य केले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले. मात्र यातील एकाही प्रकरणात काँग्रेसने मानहानीचा खटला दाखल केला का?, त्यांची खटला दाखल करण्याची हिंमत झाली का?, असा सवालच त्यांनी विचारला. जयने स्वत:च मानहानीचा खटला दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. आता या प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी कोर्टात पुरावे सादर करावे, कोर्टच आता निर्णय घेईल, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले.

जय शहाच्या कंपनीने सरकारशी व्यवहार केला नसून, सरकारकडून एक रुपयाची मदतही घेतली नाही. सरकारी जमीनही घेतलेली नाही किंवा बोफोर्ससारखी दलालीही केली नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नही निर्माण होत नाही, असे त्यांनी सांगितले. जय शहाचा वायदे बाजाराचा व्यापार असून यात उलाढाल जास्त असते. पण नफा कमी असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जयच्या कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. मात्र यात त्याचा नफा किती झाला, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असली तरी कंपनीचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, असा दावा शहा यांनी केला. यात आर्थिक गैरव्यवहारही झाला नाही, प्रत्येक व्यवहार हा धनादेशानेच झाले, असे त्यांनी म्हटले आहे.

First Published on October 13, 2017 2:46 pm

Web Title: bjp president amit shah defended his son jay says no corruption in his business deals slams congress
टॅग Amit Shah,Jay Shah