भाजपाच्या अनेक वाचाळ नेत्यांपैकी एक असलेले खासदार गिरीराज सिंह यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी फोन करुन खडसावले आहे. वादग्रस्त विधाने करणे टाळावीत असा सल्ला शाह यांनी त्यांना दिला आहे. गिरिराज सिंह यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे इफ्तार पार्टीतील छायाचित्र ट्विट करीत त्यावर वादग्रस्त कमेंट केली होती.

पाटण्यातील हज हाऊसमध्ये जेडीयूच्यावतीने सोमवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यावर टीका केली होती. त्यावर पलटवार करताना नितिशकुमार यांनी म्हटले होते की, गिरिराज सिंह प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करीत असतात.


गिरिराज सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन इफ्तार पार्टीतील नितिशकुमार यांचे फोटो ट्विट करीत म्हटले होते की, ‘हे छायाचित्र किती सुंदर दिसले असते जेव्हा याच आवडीने नवरात्रोत्सवात त्यांनी फळांचे वाटप केले असते’, आपल्या कर्मा आणि धर्माने आपण मागे का राहतो आणि दिखावा करण्यात पुढे असतो’.

गिरिराज सिंहांच्या या टिप्पणीवर जेडीयूचे प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले होते की, गिरिराज सिंह यांची ही टिप्पणी वादग्रस्त आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता वेळ आली आहे की भाजपाने त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी.