देवभूमी असलेला उत्तराखंड हे सावत्र आईच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे. देवभूमीची ही अवस्था पाहून ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनाही दुःख झाले असेल, असेही ते म्हणाले. अल्मोडा येथील परिवर्तन रॅलीमध्ये ते बोलत होते.

अमित शहा दुपारी दीड वाजताच्या सुमारास अल्मोडा येथील एसएसजे कॅम्पसमध्ये पोहोचले. परिवर्तन रॅलीसाठी गेलेल्या अमित शहा यांना सुरुवातीला व्यासपीठावर गदा भेट देण्यात आली. यावेळी भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व भाजपच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी उत्तराखंड ही गोविंद वल्लभपंतांची भूमी असल्याचा उल्लेख केला. गंगा-यमुनेची ही भूमी असल्याचे सांगून उत्तराखंड सावत्र आईच्या हातात आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विकासाच्या बाबतीत उत्तराखंड मागे पडले आहे. हरिश रावत यांच्या सरकारमध्ये राज्याचा विकास होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले. उत्तराखंड हे जगभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण होवो, अशी भाजपची इच्छा आहे. राज्याचा औद्योगिक विकास व्हायला हवा. येथील जनतेने भाजपचे सरकार आणून दाखवावे, त्यानंतर उत्तराखंड हे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवून दाखवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून शहा यांनी रावत सरकारवर टीका केली.

राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. देशाचा विकास फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. ओआरओपी ही मोदींनीच दिलेली देणगी आहे. काँग्रेस सरकार विविध योजनांचा पैसा गावोगावी पोहोचवण्यात अपयशी ठरत आहे. प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळावे, अशी आमची इच्छा आहे. भाजपच्या सरकारमध्ये लष्कराचे जवान दहशतवाद्यांना घरात घुसून दहशतवादाचा बिमोड करत आहे, असेही शहा म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद, बोगस नोटांचा कारभार, भ्रष्टाचार, काळा पैसा यांची साफसफाईच केली आहे. आमच्या नेत्यांना कोणताही त्रास नाही. पण नोटाबंदीनंतर मुलायमसिंह, मायावती, अरविंद केजरीवाल त्रस्त झालेले दिसत आहेत. ज्याच्याकडे काळा पैसा नाही, त्याला नोटाबंदीची चिंता नाही, असेही ते म्हणाले.