प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष काय? असा प्रश्न आता भाजपाने टीकाकारांना विचारला आहे. भाजपा महाराष्ट्राने काही ट्विट करुन टीकाकारांना हा प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्राला यापूर्वी १९७२, १९८७, १९८९, १९९६, २०००, २००५, २००८, २०१३, २०१६ या वर्षांमध्येही प्रतिनिधीत्व नव्हतं. दोन अपवाद वगळले तर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचंच सरकार होतं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांना वगळले अशी टीका आत्ताच का होते आहे असा प्रश्न भाजपाने विचारला आहे.

दरवर्षी ३२ राज्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी प्रवेशिका मागवल्या जातात. त्यापैकी १६ राज्यांची निवड होते. केंद्र सरकारची ८ मंत्रालयं असे २४ चित्ररथ असतात. वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून रोटेशन पद्धतीने निवड केली जाते. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ नाही म्हणून काही लोक लगेच टीका करत आहेत. विरोधकांची सरकारं असलेल्या राज्यांना वगळले म्हणून ओरड केली जाते आहे. अर्थात वस्तुस्थिती त्यांना सोयीस्करपणे जाणून घ्यायची नसेल असे म्हणत भाजपाने सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. मात्र या सगळ्या टीकेला आता भाजपाने उत्तर दिले आहे.