भाजपाकडून काँग्रेस नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते आहे असा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. डी. के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. ईडीने ही कारवाई केली आहे ज्यानंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी यावरुन भाजपावर टीका केली आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरुन कर्नाटकतले काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यापाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणानी अटक केलेले हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. याच संदर्भात सुशीलकुमार शिंदेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाकडून काँग्रेसच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे. एएनआयशी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी ही टीका केली आहे.

“भाजपाला काँग्रेसचा बदला घ्यायचा आहे असेच दिसते आहे. त्याचमुळे आमच्या पक्षातल्या लोकांवर अचानकपणे कारवाई केली जाते आहे” असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. आाता त्यांच्या या टीकेला भाजपाकडून काही उत्तर दिले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘‘माझ्या विरोधातील प्राप्तिकर आणि ईडीच्या तक्रारी या खोटय़ा आहेत आणि भाजपच्या द्वेषमूलक राजकारणातून त्या जन्मल्या आहेत. माझा ईश्वरावर आणि देशातील न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणातून कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर माझी प्रतिमा उजळून निघणार आहे.’’ अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.