गेल्या काही दिवसांमध्ये भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारविरुद्ध सामाईक मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात आता भाजपने विरोधी पक्षांना अंगावर घ्यायचे ठरवले असून, ‘गैरसमजावर आधारित’ या विरोधी मोहिमेचा थेट सामना करण्याचा निर्धार पक्षातर्फे करण्यात आला. त्यासाठी देशातील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील लोकांना या विधेयकाचे नेमके स्वरूप समजावून सांगण्याचे भाजपने ठरविले आहे. बंगळुरू येथे सुरू असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भूसंपादन विधेयकाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भूसंपादन विधेयकाबाबत आगामी काळात कशाप्रकारची राजकीय भूमिका घ्यायची, याचे आडाखेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. या बैठकीत भूसंपादन विधेयकाबद्दल सखोल माहिती असलेले पॉवरपाँईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. याशिवाय, भाजप कार्यकर्त्यांना एकत्र येऊन विधेयकासंदर्भात जनमत कसे तयार करता येईल, यासाठी पक्षाकडून ‘इन्फोर्मेशन टू काऊंटर डिसइन्फोर्मेशन’  ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली .
कोणताही ठोस आधार नसलेली आणि गैरसमजुतीवर आधारित असलेली कोणतीही मोहिम आम्ही विरोधकांना चालवून देणार नाही. त्यासाठी आमचा पक्ष प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांना हे विधेयक कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हिताचे आहे, हे पटवून देण्याच प्रयत्न करेल. त्यासाठी पक्षातील प्रत्येकजण आगामी काळात जनतेला या विधेयकाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकारांना दिली. यासाठी भाजप शिवसेनेसारख्या मित्रपक्षांचीही मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरोधकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, तर मग आमच्या मित्रपक्षांना यापासून दूर का ठेवायचे, असे त्यांनी यावेळी म्हटले.