राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा खेळ भाजपाकडून पुन्हा सुरु होणार असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. एकूण पाच राज्यांमध्ये फोडाफोडी करुन सरकार आणलं आणि सहावं राज्य राजस्थान आहे असं भाजपाच्या लोकांनी आमच्या आमदारांना सांगितलं असंही त्यांनी म्हटलं आहे. जुलै महिन्यात राजस्थानात फोडाफोडी करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. त्यावेळी काही आमदार त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यांचं त्यावेळचं वर्तन पाहून काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याबद्दल लाज वाटली. आपल्या देशाने एक काळ असा पाहिला की त्यावेळी आपल्या देशाचे गृहमंत्री हे सरदार पटेल होते आणि आज अमित शाह यांच्यासारखा माणूस आहे असं म्हणत गेहलोत यांनी अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे.

राजस्थानमध्ये जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री असलेले सचिन पायलट यांनी बंडांचा झेंडा उगारत काही आमदारांना आपल्या बाजूने वळवलं होतं. त्यामुळे राजस्थानात राजकीय भूकंप होऊन भाजपा सत्ता स्थापन करणार का? या चर्चांना उधाण आलं होतं.सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं. तसंच त्यांना इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधूनही हटवण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारवर टीका केली होती. सचिन पायलट स्वतःचा पक्ष स्थापन करतील किंवा भाजपात जातील अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आता नेमका हाच सगळा संदर्भ देत अशोक गेहलोत यांनी भाजपावर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपाने त्यावेळी पाच राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार पाडलं आता राजस्थानातही हाच खेळ पुन्हा सुरु होणार असा गंभीर गंभीर आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. तसंच गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे.