भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच देशाच्या राजधानीसह सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. सोमनाथ येथील मंदिर दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघाले. देशभरात अनेक रस्त्यांवर मोठमोठाले टीव्ही स्क्रीन लावण्यात आले होते आणि त्याद्वारे पंतप्रधानांचा शपथविधी कार्यक्रम पाहण्याची सोयही करण्यात आली होती.
देशातील अनेक ठिकाणी शपथविधीचा मुहूर्त साधत पूजा घालण्यात आल्या, तर अनेक ठिकाणी फटाके वाजविण्यात आले. भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर अनेक ठिकाणी नाचून आपला आनंद साजरा केला. केवळ मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीबद्दलच नव्हे तर अनेक राज्यांमधून निवडून आलेल्या खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळेदेखील त्या-त्या राज्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये विशेष जल्लोषाचे वातावरण होते.

पंतप्रधानांचे संकेतस्थळ सुरू
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच काही सेकंदांतच पंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ पुन्हा मोदी यांच्या संदेशाने सुरू करण्यात आले. पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर अधिकाधिक सुधारणा करण्यात आल्या असून मोदी यांच्या वैयक्तिक जीवनाबाबतची विशेष वर्गवारीही नमूद करण्यात आली आहे. मोदी यांचा थोडक्यात परिचय देण्यात आला असून धाडसी, समर्पित आणि निश्चयी नेते असा उल्लेख केला आहे.  http://www.pmindia.nic.in असा संकेतस्थळाचा पत्ता आहे.