मध्य प्रदेशात राजगढ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी CAAच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला वेगळेच रूप मिळाले. आंदोलकांना थांबवण्यासाठी तेथे उपस्थित असेलेल्या महिला उपजिल्हाधिकाऱ्याचे आंदोलकाने केस ओढल्याची घटना घडली आहे.

राजगढ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू होते. तरीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी CAAच्या समर्थनार्थ रॅली काढली. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. तिरंगा झेंडा हाती घेऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा बाजूला करत होत्या. काही आंदोलकांच्या कानसुलातही त्यांनी लगावली. या बाचाबाचीदरम्यात काही आंदोलकांनी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. त्यामुळे त्या आणखीच खवळल्याचे दिसले.

CAAच्या समर्थनार्थ मध्यप्रदेशात भाजपा रॅलीचे आयोजन करत आहे. त्याचाच भाग म्हणून राजगढमध्येही रॅली काढण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात कलम १४४ लागू होते. त्यामुळे हे कारण देत या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही भाजपा नेत्यांनी रॅली काढणारच, अशी भूमिका घेतली होती. रविवारी हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काहींच्या हाती तिरंगा झेंडाही होता. त्याचवेळी आंदोलक आणि उपजिल्हाधिकारी वर्मा यांच्यात वादावादी झाली.