राजस्थानात काळविटांची शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालावर राजस्थान उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर  राजस्थान सरकारने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सलमानला नोटीस दिली आहे.
न्या. एस. जे. मुखोपाध्याय यांनी सांगितले, की सलमान खान याला कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे व त्यावर त्याने चार आठवडय़ांत प्रतिसाद द्यावा. राजस्थान उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिल्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काळविटांच्या शिकारप्रकरणी त्याला २००६ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सलमान ब्रिटिश व्हिसा मिळवण्यास मोकळा झाला. ब्रिटिश स्थलांतर नियमानुसार एखाद्या व्यक्तीस चार वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर ती व्यक्ती व्हिसाला पात्र राहात नाही. सलमानला भावड येथील चिंकारा शिकारप्रकरणात एक वर्ष व घोडा फार्म येथे काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे.