अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये शिया पंथीयांच्या मशिदीजवळ दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला केला. दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात किमान २७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काबूलमधील दारुल अलम येथे सोमवारी शिया पंथीयांच्या मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी शेकडो जण जमले होते. या दरम्यान आत्मघाती दहशतावाद्याने मशिदीच्या आवारात प्रवेश केला. यानंतर दहशतवाद्याने अंगावरील बॉम्बचा स्फोट घडवला. स्फोटानंतर मशिदीच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. स्फोटात २७ जणांना जीव गमवावा लागला असून मृतांमध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले. तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. या हल्ल्याशी आमचा संबंध नसल्याचे तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
सोमवारी दिवसभरात काबूलमध्ये झालेला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे. सोमवारी सकाळी काबूलजवळच एका धार्मिक स्थळाजवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला होता. या स्फोटात दोन जण जखमी झाले होते.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये शिया पंथीयांच्या मशिदीजवळ हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ८० जणांचा मृत्यू झाला होता. तर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता.
#KabulExplosion – Kabul police CID chief confirms 27 dead and 35 wounded in Shia mosque blast: Afghanistan media
— ANI (@ANI) November 21, 2016