बॉब डिलन  या नावाचे वलय आणि त्याची दंतकथा १९६०च्या दशकापासून अद्याप सहा दशके संपलेली नाही. त्याच्याजवळ  पॉप स्टार किंवा रॉकस्टारला साजेसा आवाज नाही किंवा गिटारच्या फ्रेट्सवर अवघड कॉर्ड्स वाजविण्याची हातोटी असलेली शैली नाही. आवाजातील काहीशी गेंगाणी गुणगुण त्याच्या शब्दांनी झाकली गेली . पहिल्या काही अल्बमनंतर त्याचे लोकसंगीत फक्त अमेरिकेचे संचित राहिले नाही. ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी  जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली. अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ यांना या गीतांनी प्रेरणा दिली. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत मोर्चेकरी ही समूहगीते गात असत. त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.

अमेरिकेमध्ये वर्णद्वेष शिगेला पोहोचला होता. त्यात शीतयुद्धाने गडद रुप धारण केले होते. क्युबा -रशिया कराराने अमेरिकेमध्ये युद्धरुपी पवित्रा निर्माण झाला होता. व्हिएतनाम युद्धामुळे तरुणांमध्ये राष्ट्राभिमानाविरोधी खदखद निर्माण झाली होती. त्या काळात या गाण्यांमुळे तरुणांना बॉब डिलनमध्ये नेता दिसू लागला. बंडखोरीची निर्माण झालेली पोकळी बॉब डिलनने भरून काढावी अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली.

साध्या शब्दांतून समतेचे , एकात्मतेचे तत्व सांगण्याची त्याची शैली लोकांनी उचलून धरली आणि रॉकस्टार बनायच्या ऐवजी तो लोकसंगीताला मुख्य प्रवाहातील संगीत बनविणारा शिलेदार ठरला.

१९६०च्या दशकाला सर्वाधिक वेडे करणारे लोकप्रिय संगीत होते बिटल्स या ब्रिटिश बँडचे. या बँडनेही आपल्यावरचा डिलन यांचा प्रभाव मान्य केला आहे.

याच दशकामध्ये अमेरिकेमध्ये स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तिवाद फोफावला.  स्त्रीवाद, कुटुंब संस्थेचे विघटन आणि  नैतिकता हरविलेला समाज विकसित होऊ लागला.  समातील या बदलांवर अचूक भाष्य करणारी डिलन यांची गीते म्हणूनच लोकप्रिय झाली. आपल्या लोकप्रियतेने राजकीय नेत्यांना समाजासाठी चांगल्या गोष्टी राबविण्याची गळ घालण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दानशूरपणाची ‘फॅशन’ नसण्याच्या काळात आफ्रिकेतील गरीबांची भूक भागविण्यासाठी आपल्या संगीतातील मानधन देण्याचा पहिला पायंडा पाडणारा संगीतकार म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. चकचकीत मासिकांच्या मुखपृष्ठांवर वैयक्तिक गॉसिप्ससह झळकण्याऐवजी त्यांनी समाजकार्यासाठी पुढाकार घेण्यावर भर दिला. लोकसंगीताला रॉक संगीताइतके महत्व केवळ बॉब डिलन या नावामुळे मिळाले. अनेक संगीतप्रकारांना सामावून त्यांनी आपल्या लोकसंगीतामध्ये नवनवे प्रयोग केले.

डेव्हिड बोव्ही नावाचे स्टाईल आयकॉन, मायकेल जॅक्सन नावाचे नृत्यवादळ यांच्या प्रसिद्धी शिखरातही डिलन यांची गाणी लोकप्रिय झाली आहेत. अगदी तीन -चार वर्षांपूर्वीच  म्हणजे सत्तरीतही त्यांचा अल्बम लोकप्रिय झाला होता.  त्यामुळे कारकीर्दीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत डिलन यांच्या दंतकथेला विराम मिळाला नाही. निकष बदलून नोबेल मिळाल्याने ते पुन्हा अधोरेखित झाले आहे.

काव्यासाठी यापूर्वी मिळालेले नोबेल

  • १९१३ – रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या अत्यंत संवेदनशील आणि सुंदर काव्यासाठी. उच्च दर्जाच्या कौशल्यामुळे त्यांनी स्वत:च्या इंग्रजी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या काव्यविचारांना पाश्चिमात्य साहित्याचा भाग बनवले.
  • १९७५ – युजेनियो मोंटाल यांना कलात्मक संवेदनशीलतेने संपन्न अशा त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण काव्यासाठी. त्यांनी जीवनावरील दृष्टिक्षेपातून मानवी मूल्यांचा अर्थ लावला.
  • १९७७ – व्हिेसेंट अ‍ॅलेक्झांडर यांना सर्जनशील काव्यात्म लेखनासाठी. युद्धकाळादरम्यान त्यांनी स्पॅनिश काव्याच्या पुनरुज्जीवनाचे काम केले.
  • १९७९- ओडेसिस एलायटिस यांना ग्रीक परंपराच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या काव्यासाठी. त्यांनी आधुनिक माणसाचा स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांच्यासाठीचा लढा ताकदीने मांडला.
  • १९८४ – जारोस्लाव सेइफर्ट यांना ताजेपणा व कामुकता यांनी संपन्न अशा त्यांच्या काव्यासाठी. त्यांनी माणसाचा दुर्दम्य स्वभाव आणि अष्टपैलुत्व यांचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले.
  • १९९५ – सीमस हीने यांना भावपूर्ण सौंदर्याने युक्त काव्यासाठी.
  • १९९६ – विस्लावा झिंबोस्र्का यांना उपरोधिक नेमकेपणा असलेल्या काव्यासाठी.

प्रभाव

दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराचा परिणाम  डिलन यांच्या बालमनावर मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यांच्या लहानपणातच टीव्ही आणि रेडियोचे प्रस्थ समाजामध्ये वाढत होते. लहान वयातच वाद्यसंगीतामध्ये त्यांनी हुकूमत मिळविली होती. शिक्षण सोडून रॉकस्टॉर बनण्याची स्वप्ने ते पाहत होते. पन्नासच्या दशकात वुडी ग्रथी नामक डाव्या विचारांच्या कामगार नेता कवी आणि संगीतकार यांच्या संपर्कात  ते आले. पेशाने साईन बोर्ड पेंटर असलेला ग्रथी गावोगाव गिटार घेऊन स्वरचित गीते गात कामगारांचे प्रबोधन करीत असे. त्यांच्या प्रभावाने बॉब डिलन यांनी गिटार आणि माऊथ ऑरगन या वाद्यांसोबत गाणी रचण्यास सुरुवात केली.  रॉबर्ट अ‍ॅलन झिमरमन या ओळखीला  बदलून त्यांनी बॉब डिलन  हे नाव अंगिकारले. डिलन थॉमस या प्रसिद्ध  कवीच्या नावावरून त्यांनी हे नाव स्वीकारले होते.  त्यांच्यावर प्रसिद्ध अंध लोकसंगीतकार रॉबर्ट जॉन्सन , हँक विल्यम्स या ब्लूज संगीतप्रकार सादर करणाऱ्या गायकाचाही प्रभाव आहे.