प्रख्यात भारतीय पत्रकार बॉबी सिंग यांची प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाच्या संपादकपदी शुक्रवारी नियुक्ती झाली. आंतरराष्ट्रीय संपादक या पदावर नियुक्त झालेले घोष हे ‘टाइम’च्या इतिहासातील पहिले बिगरअमेरिकी पत्रकार आहेत.
घोष यांच्या निवडीची घोषणा मुख्य संपादक मार्था नेल्सन आणि व्यवस्थापकीय संपादक रिक स्टेंगल यांनी अगदी नााटय़पूर्ण शब्दांत कर्मचाऱ्यांसमोर केली. ‘आपले नवे आंतरराष्ट्रीय संपादक म्हणून बॉबी घोष यांचे नाव जाहीर करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. ते एक बिनीचे पत्रकार आहेत आणि पत्रकारितेत त्यांनी आपल्या कामाने एक उत्तुंग आदर्श निर्माण केला आहे,’ असे या दोघांनी नमूद केले.
मायदेशातील दहा वर्षांच्या पत्रकारितेनंतर आणि हॉंग काँगमधील ‘फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्य़ू’मधील दोन वर्षांच्या सेवेनंतर बॉबी हे १९९८ मध्ये ‘टाइम’ परिवारात दाखल झाले. काही वर्षांतच ‘टाइम’च्या आशियाई आवृत्तीचे ते वरिष्ठ संपादक झाले. २००७ मध्ये ‘टाइम’च्या युरोप आवृत्तीचे संपादक म्हणून ते लंडनला नियुक्त झाले होते.
इराक युद्धाच्या अतिशय धोकादायक काळात बगदाद येथील ‘टाइम’चे ब्युरोप्रमुख म्हणून त्यांनी केलेले काम हे अतुलनीय ठरले, असे नेल्सन आणि स्टेंगल यांनी नमूद केले आहे. बॉबी यांचा ट्विटरद्वारे व दूरचित्रवाणीद्वारे लोकसंपर्क आश्चर्यकारक असून जिहादच्या अखेरीबाबत त्यांनी दिलेल्या मुलाखतीला इंटरनेटवर तब्बल साडेतीन लाख लोकांनी भेट दिली आहे.