बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. याबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत, याबाबत अधिक तपशील दिल्यास तपासावर परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ७ जुलैला दहा साखळी बॉम्बस्फोटांनी बोधगया हादरले होते.
इशरत जहाँ चकमक प्रकरणात गुप्तचर विभाग आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यातील वादाबाबत विचारता याप्रकरणी चौकशी सुरू असून, त्यातून सत्य बाहेर येईल, असे उत्तर शिंदे यांनी दिले.
पट्टी-कटला जिल्ह्य़ात बहादूरपूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला तुकडीच्या प्रशिक्षण तळाच्या पायाभरणी समारंभासाठी सुशीलकुमार शिंदे आले होते. ३१९ एकर जागेत हा तळ उभारण्यात येणार आहे.