भारतीय वायुसेनेचे बळ वाढवण्यासाठी आता बोईंग ही जगप्रसिद्ध कंपनी महिंद्रा आणि एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्यांसोबत घेऊन फायटर प्लेनची निर्मिती करणार आहे. या कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार ताशी २ हजार किमी वेगाने आकाशावर राज्य करणाऱ्या लढाऊ विमानांची निर्मिती भारतासाठी करण्यात येणार आहे. बोइंग इंडिया, महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स आणि एचएएल या तिन्ही कंपन्या F/A-18 सुपर हॉर्नेट फायटर प्लेनची निर्मिती करणार आहेत. भारतीय वायु दलाची ताकद वाढवण्यासाठी तसेच मेक इन इंडिया ही मोहीम पुढे नेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

तीन महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये करार झाल्याने भारताची डिफेन्स इको सिस्टिमची व्याख्याच बदलून जाणार आहे असे यूएस एयरोस्पेस मेजर यांनी म्हटले आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मेक इन इंडियाची मोहीम प्रगतीपथावर नेण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे असे महिंद्रा डिफेन्स सिस्टिमचे एस. पी. शुक्ला यांनी म्हटले आहे. या तीन कंपन्यांमध्ये जे MoU झाले त्यानुसार ११० फायटर प्लेन्सची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुपर हॉर्नेट फायटर प्लेनची खासियत

सुपर फायटर एअरक्राफ्टच्या निर्मितीचा खर्च कमी असणार आह. तसेच कोणत्याही लढाऊ विमानापेक्षा या विमानाची ऑपरेटिंग कॉस्ट प्रति तास कमी खर्च असणारी आहे. F/A -18 सुपर हॉर्नेटमुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे. येत्या दशकात भारत शत्रुच्या नापाक इराद्यांना या फायटर प्लेनच्या साथीने सहज धूळ चारू शकतो. या विमानाचा ताशी वेग १९१५ किमी असा तर रेंज ३ हजार३३० किमी असणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गुरुवारी डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी या करारासंदर्भात माहिती देण्यात आली.